कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त; तिघांवर गुन्हा दाखल.
केडगाव प्रतिनिधी:-अशोक अडसूळ
श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औटेवाडी येथे कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत क्रूरपणे आणि दाटीवाटीने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन महेंद्रा पिकअप गाड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिवछत्रपती गौरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असून, या कारवाईत एकूण ७ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय ?
अहिल्यानगर जिल्हा गौरक्षा समितीचे प्रमुख प्रतिक गोकुळ पाचपुते यांना ५ जून २०२६ रोजी रात्री माहिती मिळाली की, दौंड – पुणे बाजूकडून जामखेड रोडने दोन पिकअप गाड्यांमधून गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पाचपुते आणि त्यांचे सहकारी यश संतोष दळवी यांनी रात्री ९:५५ च्या सुमारास औटेवाडी श्रीगोंदा येथे सापळा लावून संशयित गाड्या थांबवल्या. त्यानंतर तातडीने ‘११२’ क्रमांकावर कॉल करून श्रीगोंदा पोलिसांना पाचारण करण्यात आले.
गाड्यांची तपासणी आणि क्रूरता.
पोलिसांच्या उपस्थितीत गाड्यांची पाहणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये खालीलप्रमाणे जनावरे दाटीवाटीने आणि निर्घृणपणे बांधलेली आढळली:पिकअप क्र. MH-46/BF-0197: या वाहनात एकूण ३ लहान वासरे आणि १ बैल अशी ४ जनावरे आढळली. या गाडीचा चालक धर्मराज कोंडीबा ढाकणे (वय ४८, रा. सारुळ, ता. केज, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले सदर दोन्ही वाहनास ग्रामपंचायत केडगाव यांनी जनावरे वाहतूक करण्यासाठीचा ना हरकत दाखला दिला असल्याचे समोर आले आहे.तसेच पिकअप क्र. MH-42/BF-1380: या वाहनात ३ गिर गाई आणि १ खोंड अशी ४ जनावरे आढळली. या गाडीचा चालक लखन मनोहर निगुळे (वय २६, रा. येवता, ता. केज, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले.चौकशी दरम्यान चालकांनी सांगितले की, ही सर्व जनावरे केडगाव परिसरातून आणली असून शाकीर कुरेशी (रा. बीड) याच्या मालकीची असून ती त्याच्याकडे सोडवण्यासाठी घेऊन चाललो आहे.विशेष म्हणजे या वाहनास बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट यांनी जनावरे वाहतूक करण्यासाठीचा दाखला दिल्याचे समोर आले आहे.
केडगाव ग्रामपंचायत ने दिलेल्या दाखल्यावर सरपंचांची सहीच नाही ?
केडगाव ग्रामपंचायत ने जनावरे वाहतूक करण्यासाठी दोन्ही वाहनांना एक नाहरकत दाखला दिला आहे.परंतू सदर दाखल्याबाबत केडगाव ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच पुनम बारवकर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मी अशा प्रकारचा कोणताच दाखला कुठल्याही वाहनाला जनावरे वाहतूक करण्यासाठी दिला नसून सदर दाखल्यावर माझी सही नाही.मग प्रश्न असा आहे की, सदर दाखला दिला कोणी ? दाखल्यावरील सरपंचांच्या शिक्क्याचे खाली कोणी सही केली आहे ? दाखला देताना काही आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का ? असे अनेक प्रश्न गोसेवकांना पडले आहेत.सदर बोगस दाखला कोणी दिला ? सरपंचांच्या शिक्क्याचा गैरवापर होत आहे का ? या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येण्याची गरज असल्याची मागणी गोसवकांनी केली आहे.
दाखला बोरमलनाथ गोशाळेचा, प्रवास कत्तलखान्याचा !
बोरमलनाथ देवाच्या पवित्र नावाचा गैरवापर कधी थांबणार ? गोशाळा ही गायींच्या रक्षणासाठी आणि सेवेसाठी असते. मात्र, या प्रकरणात गोशाळेच्या अधिकृत लेटरहेडचा आणि ‘दान’ स्वरूपातील दाखल्याचा वापर जनावरांना थेट कत्तलखान्याकडे पाठवण्यासाठी एक ‘कव्हर’ (ढाल) म्हणून केला जात आहे का ? ऊसतोड मजुरांच्या नावाचा आडोसा घेऊन दाखल्यामध्ये सचिन रामराव ढाकणे या ऊसतोड मजुराचे नाव पुढे करून, “ऊसतोड संपल्याने मजुराचा परिवार गावी जात आहे” असा भावनिक उल्लेख करण्यात आला आहे. हा केवळ पोलिसांची आणि तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी रचलेला बनाव असल्याचा संशय गोरक्षकांनी व्यक्त केला आहे.
गोशाळा किंवा ग्रामपंचायतीला जनावरांच्या वाहतुकीची किंवा ती कत्तलीसाठी नेण्याची परवानगी देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. वाहन क्र. MH 42 BF 1380, MH-46/BF-0197 मधून झालेली ही वाहतूक प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा (Prevention of Cruelty to Animals Act) आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन नियमांचे थेट उल्लंघन करते.
सदरची जनावरे ही बोरमलनाथ गोशाळेतीलच असुन ती कत्तलीसाठी कुरेशी याला विकली असल्याचा संशय गोरक्षकांनी व बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.
संशयास कारण :-
१) सदर जनावरे ही कोणी दान दिली आहेत त्याचा उल्लेख नाही ?
२) सदर जनावरे ही शाकीर कुरेशी याची असल्याचे वाहन चालकाने थेट सांगितले आहे.
३) जर गोशाळेने जनावरे दान दिली किंवा विकली नाहीत तर गोशाळेने वाहतुकीसाठी दाखला का दिला?
४ ) गोशाळेला वाहतुकीसाठी दाखला देण्याचा अधिकार आहे का ?
५) सदर जनावरे घेऊन जाणारी वाहने परिवारासह गावी जात आहेत असा दाखला दिला आहे. परंतु सदर वाहनात परिवार असल्याचे कुठेही दिसून येत नाही ?
६) सदर जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाकडून प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना याची तपासणी केली होती का ?
७) दान दिलेल्या मालकाकडे जनावरां संबंधी चौकशी केली होती का ?
त्यामुळे सदर प्रकरणात बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट व केडगाव ग्रामपंचायतचा बोगस दाखला ज्यांनी दिला त्यांना सुद्धा गुन्हा करण्यास सहकार्य केल्याबद्दल सह आरोपी करावे व ज्यांनी ही जनावरे कुरेशी याला विकली त्यांना देखील आरोपी करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याप्रकरणी तक्रारदार प्रतिक पाचपुते यांच्या फिर्यादीवरून सदर जनावरांना कृरतेची वागणूक देऊन कत्तलीसाठी घेऊन जात असताना मिळून आले म्हणूनआरोपी धर्मराज ढाकणे, लखन निगुळे आणि शाकीर कुरेशी यांच्याविरुद्ध ‘प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६०’ मधील कलम ११ आणि ‘महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६’ च्या विविध कलमांन्वये श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जमुना बाजंगे या करत आहेत.






