मुख्य चौकात रोडवर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावताना ग्रामस्थ.
बोरीपार्धी : अशोक अडसूळ
केडगाव स्टेशन येथील हनुमान मंदिरा जवळ मुख्य रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. सदर बाबत ग्रामपंचायत पासून मुख्यमंत्री कार्यालया पर्यंत निवेदन देऊन सुद्धा रस्त्याची दुरुस्ती झाली नाही म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बोरीपार्धी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एक अनोखे आंदोलन केले.
ग्रामस्थांनी आज दुपारी बोरीपार्धीच्या मुख्य चौकात पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यात झाडे लावून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.बोरीपार्धी येथील खड्ड्यांची समस्या अत्यंत गंभीर आहे. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असुन रात्रीच्या वेळी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.”प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही काहीच कारवाई झाली नाही, त्यामुळे हे आंदोलन करावे लागले,असे बोरीपार्धी ग्रामपंचायत सदस्य अनिल नेवसे व सामाजिक कार्यकर्तै प्रदेश शेलार यांनी सांगितले.
आता या अभिनव आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.या आंदोलनात सहभागी झालेले लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.हे आंदोलन बोरीपार्धीतील समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले जाईल आणि रस्त्याची दुरुस्ती लवकर होईल, अशी आशा आहे.या आंदोलनात पुरोगामी संघर्ष परिषद जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पवार,माजी उपसरपंच राजू शेलार,शालूमन लोणकर,राजू नेवसे,राजेंद्र अडागळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.





