बारामती : बारामती येथून सकाळी ०७:१५ वाजता सुटणारी बारामती–पुणे डेमू रेल्वे दौंड रेल्वे स्थानकावर दररोज सिग्नलच्या कारणास्तव दीर्घकाळ थांबवली जात असल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, प्लॅटफॉर्म उपलब्ध असतानाही डेमू रेल्वेला त्वरित प्रवेश दिला जात नाही आणि इतर एक्सप्रेस गाड्यांना प्रथम मार्ग दिला जातो.
या दैनंदिन विलंबाचा फटका हजारो नोकरदार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. अनेकांना कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे कठीण होत असून, वेळेचे, आर्थिक तसेच मानसिक नुकसान सहन करावे लागत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
याचप्रमाणे, पुणे येथून संध्याकाळी ०६:४५ वाजता सुटणारी शटल डेमू रेल्वेही अनेकदा विलंबाने बारामतीला पोहोचत असल्याने रोजच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, मार्गावर इतर एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्यामुळे ही डेमू रेल्वे दररोज सुमारे अर्धा ते एक तास उशिराने धावत असून, त्याचा मोठा फटका दैनंदिन प्रवाशांना बसत आहे.
बारामती–पुणे मार्गावरील प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन दौंड स्थानकावर डेमू रेल्वेला प्राधान्याने प्रवेश द्यावा, सकाळी ०७:१५ वाजता बारामतीहून सुटणारी डेमू रेल्वे नियोजित वेळेत पुणे स्टेशनवर पोहोचेल तसेच पुण्यातून संध्याकाळी ०६:४५ वाजता सुटणारी शटल डेमूही वेळेत बारामतीला पोहोचेल, यासाठी आवश्यक नियोजन व सिग्नल व्यवस्थापनात तातडीने सुधारणा कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
वेळेवर धावणारी डेमू सेवा ही हजारो विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची असून, रेल्वे प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. हर्षल शिंदे बारामती–पुणे रेल्वे प्रवासी.






