बोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेतील गोशाळा.
बारामती न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

केडगाव प्रतिनिधी :- अशोक अडसूळ
दिनांक. ४ एप्रिल २०२६ रोजी दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका टेम्पोमधून सहा म्हशी आणि दोन रेडकांची वाहतूक करताना पोलिसांनी ती जप्त केली होती आणि आरोपी प्रकाश बिबे याच्यावर प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर ही जनावरे तात्पुरती देखभालीसाठी ‘श्री बोरामलनाथ गोशाळा ट्रस्ट’कडे सुपूर्द करण्यात आली होती. यानंतर जनावरांचे मूळ मालक काळू उर्फ काळूराम मच्छिंद्र चव्हाण रा. थेऊर, ता. हवेली यांनी जनावरांचा ताबा मिळण्यासाठी दौंडच्या न्यायालयात अर्ज केला. २८ मे २०२६ रोजी दौंडच्या प्रथम वर्ग न्यायालयाने जनावरांचा अंतरिम ताबा मालक काळूराम चव्हाण यांना देण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात गोशाळा ट्रस्टने बारामती अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती व रिव्हिजन अर्ज दाखल केला होता.
सुनावणी दरम्यान जनावरांच्या मालकातर्फे ॲड.समीर शेख यांनी कोर्टासमोर त्यांची बाजू मांडताना स्पष्ट केले की,सदर जनावरे ही आमची असून ती दुभती आहेत.त्यांच्या खरेदीच्या पावत्या देखील असून त्यांना कुठेही इजा झालेली नाही अथवा त्यांना कोणत्याही कत्तलखान्यात कत्तलीसाठी चालवले नव्हते.याउलट सदर गोशाळा ही जनावरांचा व्यवस्थीत सांभाळ करत नसल्याचे यापूर्वीच्या चौकशी अहवालात नुमद केले आहे तो अहवाल कोर्टासमोर सादर करण्यात आला होता.तसेच शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते.तसेच मा.सुप्रीम कोर्ट व मा. हायकोर्ट यांचे न्यायनिर्णय देखील दाखल केले होते.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने गोशाळेचा रिव्हिजन अर्ज फेटाळून लावला व म्हशी व रेडके ही मूळ मालकालाच देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. तसेच सदर गोशाळेला ५,००० रुपयांचा दंड ठोठावला असुन हा दंड गोशाळेने मूळ मालकाला 30 दिवसाच्या आत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.तसेच मे.कोर्टाने देखभाल खर्चात देखील कपात केलेली आहे.
सुनावणी दरम्यान न्यायालयाने नोंदवले की, जप्त केलेल्या सहा म्हशी आणि दोन वासरे हे दुभते आहेत. गेल्या ७५ दिवसांपासून ही जनावरे गोशाळेच्या ताब्यात आहेत, मात्र या काळात म्हशींच्या दुधापासून मिळालेल्या उत्पन्नाचा कोणताही हिशोब गोशाळेने कोर्टासमोर दिला नाही. एकीकडे गोशाळा ट्रस्ट जप्त केलेल्या जनावरांच्या दुधाचे उत्पन्न स्वतःकडे ठेवत आहे आणि दुसरीकडे मालकाकडून देखभालीचा खर्चही मागत आहे. हे गोशाळा ट्रस्टचे ‘अन्यायकारक समृद्धीकरण’ असून न्यायालयाच्या प्रक्रियेचा दुरुपयोग आहे,” असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.
सदर जनावरांच्या मालका तर्फे बारामती न्यायालयात ॲड.समीर शेख यांनी काम पाहिले तसेच दौंड न्यायालयात ॲड.विष्णुपंत माने यांनी काम पाहिले होते.
एकंदरीत कोर्टाने गोशाळेला ५,००० रुपयांचा दंड केला असून सर्व म्हशी व वासरे त्यांचे मूळ मालक काळूराम चव्हाण यांच्या स्वाधीन करण्याचे आदेश दिले आहेत.






