दापोडी, ता. दौंड : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दापोडी येथे यंदा भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्याने आयोजित हा आध्यात्मिक सोहळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ ते शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, दापोडी, ता. दौंड, जि. पुणे येथे उत्साहात पार पडणार आहे.
दापोडीच्या पवित्र भूमीत गेल्या अनेक वर्षांपासून वै.ह.भ.प. अर्जुन महाराज शेळके यांच्या कृपाशीर्वादाने धार्मिक व अध्यात्मिक परंपरा जपली जात असून, यंदाचा हा सोहळा विशेष उत्साहात साजरा केला जाणार आहे. मानवी जीवनात सुख, समाधान आणि अध्यात्मिक समृद्धी निर्माण व्हावी, तसेच संतांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे काकड आरती, सकाळी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व महापूजा, त्यानंतर संत तुकाराम महाराज गाथा भजन, दुपारच्या सत्रात पारायण, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन आणि त्यानंतर हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण आठवडा दापोडी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
या सप्ताहामध्ये विविध मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळी आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सेवा देणार आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर विशेष धार्मिक कार्यक्रम, पूजा, भजन, कीर्तन आणि पारंपरिक उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्यादरम्यान शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दिंडीमध्ये परिसरातील भाविक, वारकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची अपेक्षा आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि भगव्या पताकांसह निघणारी ही दिंडी परिसराचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
सप्ताहाची सांगता शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार असून, रात्री ९ ते ११ वाजेदरम्यान माऊली कृपा कलानाट्य मंडळ, जांबूत, ता. शिरूर, जि. पुणे यांच्या वतीने भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह.भ.प. माणिक सोनबा मोटे असून, सल्लागार श्रीपती किसन रुपनवर व कार्यवाह ह.भ.प. संदीप रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दापोडीतील ग्रामस्थ, मंदिर व्यवस्थापन, विविध सेवेकरी व भाविकांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडणार आहे.अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून भक्ती, श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दापोडी व परिसरातील भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या मंगलमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





