सत्यप्रकाश न्यूज प्रतिनिधी :-अशोक अडसूळ
बोरीपार्धी :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादीचा ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम’ (Special Intensive Revision – SIR) राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आगामी दोन ते तीन दिवसांत आपल्या गावातील आणि परिसरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन मतदारांना आवश्यक फॉर्मचे वाटप करणार आहेत.
लोकशाहीच्या या प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, यासाठी निवडणूक प्रशासनाकडून मतदारांना आवाहन करण्यात आले आहे. फॉर्म भरताना कोणतीही अडचण येऊ नये आणि प्रक्रियेत विलंब होऊ नये, यासाठी मतदारांनी खालील कागदपत्रे आणि माहिती आधीच तयार ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत:
आधार कार्ड (प्रत)
मतदार ओळखपत्र (Voter ID Card)
चालू मोबाईल क्रमांक
दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो
ई-मेल आयडी
फोटोबाबत विशेष सूचना:
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, SIR फॉर्मसोबत दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो जोडणे अनिवार्य आहे. ज्या मतदारांकडे सध्या फोटो उपलब्ध नाहीत, त्यांनी विलंब टाळण्यासाठी त्वरित फोटो काढून तयार ठेवावेत, जेणेकरून BLO आपल्या घरी आल्यावर फॉर्मची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करता येईल.
निवडणूक प्रक्रियेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व मतदारांनी संबंधित BLO यांना सहकार्य करावे. तसेच, ही महत्त्वाची माहिती आपल्या कुटुंबातील सदस्यांसह शेजारी आणि मित्र-परिवारापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून कोणीही नागरिक मतदानापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






