अनधिकृत बांधकामांचा पंचनामा करताना महसूल अधिकारी व ग्रामस्थ !
बोरमलनाथ देवस्थान इनाम जमिन गट नंबर १४४ मध्ये अनधिकृत बांधकाम चालू असलेबाबत ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी दौंड यांच्याकडे तक्रार केली होती.त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार दौंड यांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी बोरीपार्धी व ग्राम महसुल अधिकारी धायगुडेवाडी यांनी पंचांसमक्ष स्थळपहाणी पंचनामा करून पुढील आदेशापर्यंत कामे बंद ठेवण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.
सत्यप्रकाश न्यूज प्रतिनिधी : अशोक अडसूळ
बोरीपार्धी गावचे प्रसिद्ध ग्रामदैवत श्रीमंत बोरमलनाथ देवस्थान हे महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असुन धायगुडेवाडी येथे चौफुला केडगाव रोडलगत गट नंबर १४४ मध्ये १४ हे.४० आर जमिन कब्जेदार सदरी बोरमलनाथ देवाच्या नावे असुन देवाच्या दिवाबत्ती, यात्रा उत्सव ,धार्मिक कार्यक्रम व देखभाल दुरूस्ती साठी देवस्थानचे पुजारी शेलार कुटूंबातील सदस्यांकडे वहीवाटीसाठी आहे.
दिनांक-२.१०.२०१५ रोजी ग्रामसभेने बोरमलनाथ देवस्थान संबंधी केलेला ठराव.
श्री.बाळासाहेब किसन सोडनवर यांनी सौ.सुनिता धनंजय थोरात तात्कालीन सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत विषय मांडला होता की,बोरमलनाथ देवस्थान हे तिर्थक्षेत्र दर्जात समाविष्ट झाले असून बोरमलनाथ पुजारी हे विकासकामे करताना ग्रामस्थांना सहभागी करून घेत नही.नवीन विकास कामे मंजूर करताना ग्रामपंचायत सदस्यांना व ग्रामस्थांना विचारात घेत नाहीत.मंदिर हे सर्व गावचे असून त्यावर गावातील प्रत्येक व्यक्तिचा हक्क आहे. पुजारी हे मंदिराची जमीन परस्पर भाड्याने देत आहे.त्यामुळे सभेत चर्चा करून यापुढे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यांनी देवस्थानचे विकासकामांवर नियंत्रण व देखरेख ठेवावी.ग्रामसभेच्या ठरावाशिवाय कोणतीच नविन कामे मंदिर परिसरात व देवस्थान जमिनीत करू नये.असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता.
ग्रामसभेच्या ठरावाला हरताळ; पुजाऱ्याच्या मनमानी कारभाराविरुद्ध ग्रामस्थांचा संताप .
बोरमलनाथ पुजारी कैलास गुरव व इतर ट्रस्टी यांनी ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयांना आणि ठरावांना केराची टोपली दाखवत बेकायदेशीर कामे केल्याचे उघडकीस आले आहे. या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.ग्रामसभेच्या ठरावाला झुगारून ग्रामस्थांचा विरोध असताना मनमाणी करून बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत पुजाऱ्यामध्ये येते कुठून; गावातीलच काही प्रमुख मंडळींचा बेकायदेशीर कामे करण्यामागे पाठिंबा असल्याची चर्चा ग्रामस्थांमधे आहे.काही ग्रामस्थांनी सांगीतले की, वेळ आल्यास पुराव्यासह काही लोकांची नावे सुद्धा जाहीर करू.
मी जोपर्यंत सरपंच पदावर आहे तोपर्यंत बोरमलनाथ मंदिर बाबत कसलीच कार्यवाही करणार नाही ! बाळासाहेब दशरथ सोडनवर सरपंच बोरीपार्धी यांची भुमिका
ठरावा संदर्भात अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीने दि.११.२.२०२५ रोजी ग्रामपंचायतला लेखी निवेदन देऊन झालेल्या ठरावावर योग्यती कार्यवाही करावी अशी मागणी केली होती.तसेच ठरावावर अंमलबजावणी होत नाही म्हणून दि.२१.२.२०२५ रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती दौंड यांना लेखी तक्रार केल्यानंतर पंचायत समितीने सरपंच व ग्रामसेवक यांना दि.४.३.२०२५ व दि.१०.६.२०२५ रोजी लेखी कळवून नियमोचित कार्यवाही करण्यास सांगीतले होते.तरीदेखील कारवाई होत नाही म्हणून बचाव समीतीने सरपंच व ग्रामसेवक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कार्यवाही करण्याची विनंती केली असता;सरपंच बाळासाहेब दशरथ सोडनवर यांनी ” मी जोपर्यंत या पदावर आहे तोपर्यंत बोरमलनाथ मंदिर विषयावर कसलीच कार्यवाही करणार नाही;तुम्हाला जे करायचे ते करून घ्या नाहीतर माझ्यावर कारवाई करा “ असे उत्तर दिल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.”ग्रामसभेचा निर्णय हा सर्वोच्च असतो, तरीही पुजाऱ्याला पाठीशी का घातले जात आहे ?” असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.आता या प्रकरणाची दखल वरिष्ठ अधिकारी घेणार का, याकडे संपूर्ण गावासह परिसराचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांची अनधिकृत बांधकामा विरूद्ध उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार.
बोरमलनाथ देवस्थान जमिनीत पुजारी बेकायदा,बिगर परवाना अनधिकृत बांधकाम करत असल्याचे ग्रामस्थांना समजताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे दि.१८.९.२०२४ रोजी व उपविभागीय अधिकारी दौंड यांच्याकडे दि.१९.५.२०२५ रोजी लेखी निवेदन देऊन अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवून योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती.या प्रकरणात तहसीलदार दौंड यांनी संबंधीतांना नोटिस काढून अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले होते.काही दिवस थांबून संबंधीतांनी पुन्हा काम सुरू करूण अनधिकृत बांधकामे उभी केली.सदर क्षेत्रातुन अनधिकृत पणे माती उचलल्यामुळे तहसीलदार दौंड यांनी एकूण ४२ लाख रूपये दंड केला असल्याचे समीतीच्या सदस्यांनी सांगीतले.
मागील एक महिन्यापासून पुन्हा सदर क्षेत्रात रमेश गुरव यांनी अनधिकृत बांधकाम सुरू केल्याने ग्रामस्थांनी दि.१०.६.२०२६ रोजी पुन्हा उपविभागीय अधिकारी दौंड यांच्याकडे तक्रार करून तात्काळ काम बंद करून देवस्थान जमिनीत अनधिकृत झालेल्या बांधकामांवर कारवाई करून अनधिकृत बांधकामे निष्कासित (पाडण्यात) यावी अशी मागणी केली.त्या अनुषंगाने तहसीलदार दौंड यांना आदेशीत करून उचित कारवाई करावी असे कळवल्याने मडल अधिकारी बोरीपार्धी व ग्राम महसूल अधिकारी धायगुडेवाडी यांना कारवाईचे आदेश देण्यात आले.
महसुल अधिकाऱ्यांकडून स्थळ पहाणी पंचनामा पुर्ण ! सर्वच स्तरातून महसूल अधिकाऱ्यांचे कौतुक.
महसूल अधिकाऱ्यांनी देवस्थान जमिन गट नंबर १४४ मध्ये पंचांसमक्ष पंचनामा केला त्यामधे त्यांना शिरूर सातारा रोडच्या पुर्व बाजूस स्मशानभुमी,कचरा डेपो,२७ व्यापारी गाळे,गोशाळा,७ निवासी खोल्या,एक एकरात वीटभट्टी असल्याचे दिसून आले.तसेच रोडचे पश्चिम बाजुस ८४×२५ फुट लांबी रुंदी व ३.५ फुट सिमेंट काँक्रीट,विटांचे पक्के बांधकाम (पाया) केल्याचे दिसले.तसेच २० व्यापारी गाळे,एक निवासी घर,सार्वजनिक पाण्याची टाकी,एक विहीर अढळुन आली.महसूल अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामा करून योग्य कार्यवाही केल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
मागील काही दिवसांपासून बोरमलनाथ देवस्थान ट्रस्टच्या संबंधी ग्रामस्थांकडुन अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले असून सदर प्रकरण हे तालुक्यासह जिल्ह्यात गाजत आहे.ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवणारांवर व अनधिकृत कामे करणारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बोरीपार्धी ग्रामस्थांनी केली आहे.निष्पक्षपणे लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.






