केडगाव प्रतिनिधी :- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील ‘नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालय’ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या संस्थेने ऑनलाइन हॉस्पिटल नोंदणी करताना दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर केल्याची तक्रार बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीच्या सदस्यांनी केल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्रिसदस्यीय चौकशी समितीची नियुक्त केली आहे. सदर समिती मध्ये डॉ.मिलिंद चिद्दरवार जिल्हा आयुष अधिकारी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून डॉ. उज्वला जाधव तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती दौंड यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तसेच आसिफ सय्यद यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर समिती ही डॉ. रामचंद्र हंकारे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.
नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालय (नोंदणी क्र. MH/PUNE/NH0888) यांनी ऑनलाइन नोंदणी करताना जमीन गट नंबर १४४ बोरमलनाथ देवस्थान इनाम जमीनीची कागदपत्रे सादर केली होती. तसेच ग्रामपंचायत बोरीपार्धी यांनी नाहरकत प्रमाणपत्र देताना ग्रामपंचायत मिळकत क्रमांक १४५६/३ मध्ये सदर दवाखाना असल्याचे नमूद केले आहे .बोरीपार्धी ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. अशोक भागुजी अडसुळ यांनी केलेल्या तक्रारीनुसार, या दवाखान्याची मंजुरी बोरमलनाथ देवस्थान जमीन गट नंबर १४४ मध्ये घेतली असून प्रत्यक्षात दवाखाना वनविभागाची जमीन गट नंबर २३३ (७) अ या जागेवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून उभारल्याचा आरोप केला आहे.या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी एका विशेष समितीची स्थापना केली होती. सदर समिती दिनांक १ जुलै २०२६ रोजी दुपारी नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालयात चौकशीसाठी आली होती. सदर समितीने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असून लवकरच अहवाल सादर करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे समितीच्या अध्यक्षांनी सांगितले आहे.
नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालयाने कागदपत्रे सादर करण्यासाठी मागितली सात दिवसांची मुदत !
नाथसाखा आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या चौकशी समितीने चिकिस्तालयाचे प्रमुख डॉ.निलेश कैलास शेलार यांच्याकडे दवाखान्या बाबत कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी मला कागदपत्र सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत द्या असे लेखी निवेदन दिले आहे. त्यांना लवकरात लवकर कागदपत्र सादर करण्याचे सांगितले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉक्टर चिद्दरवार यांनी सांगितले. यावेळी तक्रारदार यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला असून तक्रारदार यांनी दवाखान्या संबंधीचे सर्व पुरावे समिती समोर सादर करून दोषींवर भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तात्काळ नाथसखा दवाखाना बंद करण्याची मागणी केली आहे. आता नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालय सात दिवसात कोणती कागदपत्रे सादर करणार हे पाहणे औस्तुक्याचे राहील .






