ग्रामपंचायतने वाटप केलेल्या टपरीतच मटका जुगारीचा अड्डा.
बोरीपार्धी :-
बोरीपार्धी गावचे हद्दीत केडगाव स्टेशन उड्डाण पूला खाली मारूती मंदिरा जवळ एका टपरीमध्ये राजरोसपणे मटका जुगारीचा खेळ खेळला जात आहे.सदर जुगारीमुळे तरूण वर्गाबरोबरच वयस्कर मंडळी देखील कामधंदा सोडून दिवसभर मटका जुगाराच्या अड्ड्याभोवती घिरट्या घालताना दिसत आहेत.मटका खेळण्यासाठी उसने पासने पैसे घेऊन बायका मुलांच्या तोंडातला घास काढून जुगार खेळला जात असल्याचे भयान वास्तव समोर येत आहे.त्याचा परिणाम त्यांच्या कुटबाला भोगावा लागत आहे.जुगारात हरला की टेंशन मध्ये तरूण वर्ग विवीध व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

दिनांक २१ जुलै रोजी गावातील काही महीला व पुरूष मंडळींनी ग्रामपंचायत सदस्य शेखर सोडनवर यांची भेट घेऊन जुगार अड्ड्यामुळे त्यांना होत असलेल्या मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल व्यथा मांडली. त्यामुळे शेखर सोडनवर यांनी बोरमलनाथ बचाव समीतीच्या काही सदस्यांना व ग्रामस्थांना सोबत घेऊन मटका जुगारीच्या अड्ड्यावर जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी एक व्यक्ती मटका जुगारीच्या चिठ्ठ्या फाडत असल्याचे त्यांना दिसले. त्यास सदर मटका जुगारीचा अड्डा कोणाचा आहे असे विचारले असता त्याने रमेश मारकड याचे नाव सांगीतले आहे.सदर जुगार अड्ड्यावर कारवाई करावी याकरीता पोलीस स्टेशन कडून मदत मागण्यात आली परंतू पोलीस मदत मिळण्यापूर्वीच सदर व्यक्तिने तेथून पळ काढला.सदर बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी दडस साहेबांना फोन करून घडलेला प्रकार सांगीतला व घटनेचे फोटो व व्हीडिओ चित्रिकरण साहेंबांना पाठवले असता सदर बाबत योग्य ती कारवाई करण्याचे अश्वासन दडस साहेबांनी दिले असल्याचे शेखर सोडनवर यांनी सांगीतले.

यापुर्वी अनेक वेळा ग्रामसभांमध्ये अवैध धंद्यांविरोधात चर्चा करून बोरीपार्धी गावचे हद्दीत अवैध धंदे चालून द्यायचे नाही असे ठरले असताना देखील बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या हाकेच्या अंतरावर ग्रामपंचायतने वाटप केलेल्या टपरीतच जर असे अवैध धंदे सुरू असतील तर या धंद्यावाल्यांना कोणाचे अभय आहे ? या धंदेवाल्यांचा आका कोण आहे ? यामधून काही टक्केवारी आकाला चालू आहे का ? असे अनेक सवाल आज ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.अनेक वर्ष बंद असलेला जुगार मटका गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगीतले.बोरमलनाथ बचाव समीतीचे सदस्य संदिप चव्हाण यांनी गेल्या वर्षीच सदर बाबत तक्रार करून अवैध धंदे बंद करण्यात यावे असे निवेदन पोलीस स्टेशनला दिले होते.त्यावर पोलीसांनी सदर व्यक्तींवर कारवाई करत अवैध धंदे बंद केले होते.तरीदेखील मुजोरपणा करत पुन्हा राजरोसपणे सदर व्यक्ती मटका जुगारीचा अड्डा चालवित असेल तर नक्कीच यापाठिमागे कोणाचातरी हात असल्याची चर्चा ग्रामस्थांमधे होत आहे. शेखर सोडनवर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगीतले की,या धंद्यामध्ये ग्रामपंचायतच्या एका लोकप्रतिनिधीची भागीदारी असल्याचे लोकांकडून समजत आहे.सदर बाबत माहीती घेऊन जुगार मटका चावलणारांवर व त्यांना मदत करणारांवर गुन्हे दाखल करून त्यांना पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.यापुढे समाजहितासाठी बोरीपार्धी गावचे हद्दीत कुठलेच अवैध धंदे चालू देणार नाही.त्याबाबत ग्रामस्थांसह आम्ही पोलीस निरीक्षक साहेब यवत यांची भेट घेऊन अवैध धंद्यांवर कडक कारवाई करून यापुढे बोरीपार्धी हद्दीत अवैध धंदे चालू देऊ नये याकरीता त्यांना निवेदनाद्वारे विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.सदर बाबत पोलीस स्टेशन कडून काय कारवाई होते याची उस्तुकता ग्रामस्थांना लागली आहे.





