मान्यवरांच्या हस्ते “आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार” स्वीकारताना डॉ. उमेश कणकवलीकर.
पुणे :-
शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी पुणे येथील ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ येथे एका विशेष सोहळ्यात डॉ. उमेश कणकवलीकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रभक्ती परिवार, प्रहार युथ ऑर्गनायझेशन आणि विजेता मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. उमेश कणकवलीकर हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून, त्यांनी साहित्यातून आणि सामाजिक कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. ‘मी विजेता होणारच’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणून ते सर्वश्रुत आहेत. या पुस्तकाच्या १२५ आवृत्त्या प्रकाशित होण्याच्या मार्गावर असून, त्यांची ३० पेक्षा जास्त पुस्तके लोकप्रिय झाली आहेत. त्यांना मुंबई विद्यापीठ,भारती विद्यापीठ,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर जोशी,पद्मविभूषण आण्णा हजारे,पद्मभूषण सिंधुताई सपकाळ या मान्यवरांची व विद्यापीठांची शिफारस लाभली आहे.’महाराष्ट्र टाइम्स’च्या बेस्टसेलर यादीत हे पुस्तक सलग तीन वर्षे झळकले होते.
डॉ. कणकवलीकर यांनी युनियन बँकेतील १६ वर्षांची नोकरी सोडून पूर्णवेळ ‘मी विजेता होणारच!’ यासारख्या कार्यक्रमांमधून ३५०० पेक्षा जास्त प्रयोगांतून जनसामान्यांना प्रेरणा दिली आहे. तसेच सरांच्या “मी प्रेरणा घेणारच!” या दुसऱ्या कार्यक्रमाचे १५०० पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत.सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे असून, कणकवलीकर कुटुंबाने आजवर एकूण २०३ वेळा (८९ लिटर) रक्तदान करून ‘जीवनदाता’ पुरस्कार प्राप्त केला आहे. जलयुक्त शिवार साठी २५ हजार व पूरग्रस्तांना मदत म्हणून २५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस वैयक्तिकरित्या दिला होता.सरांना ‘आर्ट ऑफ विनिंग’ या विषयावर पी.एच.डी. या डॉक्टरेट डिग्रीने सन्मानित करण्यात आले आहे.सरांना शाळा-कॉलेजमधून, महाराष्ट्र पोलीस, टाटा मोटर्स, एल.आय.सी. इंडिया, आय.सी.आय.सी.आय, गोदरेज, कल्याणी ब्रेक्स्, चौधरी यात्रा कंपनी, सुप्रीम इंडस्ट्रीज, भारत पेट्रोलियम अशा नामवंत कंपन्यांमधून ट्रेनिंगसाठी बोलावले जाते.त्यांनी शिरुर , पूणे येथे ‘शिष्यकुल’ उभारले आहे, ही एक सामाजिक सस्था असून इथे सरांनी हजारो पुस्तकांचे ग्रंथालय निर्माण केले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे, ज्यामध्ये ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार’, ‘विधानसभा जीवन गौरव पुरस्कार’ आणि ‘प्रेरणादायी व्यक्तिमत्व पुरस्कार’ यांचा समावेश आहे. सामाजिक कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्तेही गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या नवीन यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.





