पिंपळे गुरव :-
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रारंभ तसेच शाळेच्या नवीन बुद्धविहार इमारतीचा पायाभरणी समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमास शाळेचे स्थानिक अध्यक्ष प्रा. आयु. अरविंद साळवे, कार्यालयीन अधीक्षक आयु. अजित गायकवाड, मुख्याध्यापक आयु. आदित्य साळवे तसेच शाळेच्या ॲडमिन आयु. प्रतीक्षा साळवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी सैराट चित्रपटाचे कला दिग्दर्शक व दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित आयु. संतोष संखद, शाळेचे कायदेशीर सल्लागार ॲड. प्रवीण गायकवाड, माजी पीटीए अध्यक्ष आयु. शशिकांत दुधारे, सामाजिक कार्यकर्ते आयु. नितीन सोनवणे, बौद्धाचार्य आयु. अरुण कांबळे, तसेच पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यालयीन अधीक्षक आयु. अजित गायकवाड यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर बोधिवृक्षाच्या रोपाचे रोपण व पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात कुदळ मारून बुद्धविहाराच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी समारंभात सहभाग नोंदविला. यानंतर उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले.यानंतर बुद्धपूजन पार पडले. बौद्धाचार्य आयु. अरुण कांबळे यांनी उपस्थितांना आषाढी पौर्णिमा व वर्षावासाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगितले. तसेच आजपासून शाळेमध्ये वर्षावास उपक्रमास प्रारंभ झाल्याची घोषणा केली.
शाळेचे अध्यक्ष प्रा. आयु. अरविंद साळवे यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या भावी विकासाचा आराखडा मांडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत पालकांनी शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. याच कार्यक्रमात त्यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या पीटीए (पालक-शिक्षक संघ) समितीची नव्याने नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या ॲडमिन आयु. प्रतीक्षा साळवे यांनी प्रभावीपणे केले. शेवटी कार्यालयीन अधीक्षक आयु. अजित गायकवाड यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, बुद्धविहाराच्या नवीन इमारतीच्या उभारणीमुळे शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





